कराड तालुक्यातील ‘या’ गावच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | शेणोली, ता. कराड येथील ग्रामपंचायत सरपंचावर बुधवारी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात तहसीलदार विजय पवार यांनी मंगळवारी (दि. २८) ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावली आहे.

सरपंचाविरोधात तहसीलदार विजय पवार यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावात म्हटले आहे की, सरपंच जयवंत बजरंग कणसे हे मनमानी तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेवून काम करत नाहीत. विकासाची तसेच नागरी सोयी-सुविधांची कामे करत नाहीत. मासिक मिटींग व ग्रामसभा मिटींगमधील मंजूर ठरावाप्रमाणे काम करत नाहीत किंवा ठरावाप्रमाणे कामकाज करून ठरावाची पुर्तता करत नाहीत. त्यामुळे विकासाची कामे ठप्प झाली आहेत.

सरपंचांच्या कारकिर्दीत पदाधिकारी व सदस्यांशिवाय बाहेरील व्यक्तीचा हस्पेक्ष होत असून विकास व गावाची सुधारणा, याबाबतची कार्यवाही योग्य प्रकारे होत नाही. सरपंचांमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज बेशिस्त झाले आहे. मासिक मिटींगमध्ये एखाद्या सदस्याने आमदार, खासदार यांच्या विकासकामाचा ठराव मांडला तर सरपंच ते ऐकुण घेत नसल्यामुळे विकासकामे होईनात. ते एकतर्फी आणि मनमानीपणे कामकाज करत आहेत. त्यांचेवर आम्हा सदस्यांचा विश्वास राहिलेला नाही.

शेणोली सरपंचाच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर नारायण शिंगाडे, संतोष कणसे, इकबाल मुल्ला, सुधीर बनसोडे, आशा गायकवाड, शोभाताई सुर्यवंशी, रेश्मा सुर्यवंशी, रिजवाना मुल्ला, सुवर्णा पाटील, संगिता माळी या ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.