सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. जिल्हा कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेण्यासाठी आल्यावर बेकायदा जमाव जमवून दहशत माजविणारी वक्तव्ये करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी नऊ जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निखिल बर्गे, अक्षय बर्गे, राधेश्याम कदम, राज पवार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व त्यांच्या चार साथीदारांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलिस ठाण्याचे हवालदार सचिन रिटे यांनी याबाबत फिर्याद नोंदविली आहे. त्यांचा मित्र अथर्व पवार हा जिल्हा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत होता. जामीन मंजूर झाल्याने १८ जानेवारीला त्याची कारागृहातून सुटका झाली.
यावेळी संशयित त्याला नेण्यासाठी शहर पोलिस ठाण्याजवळ आले होते. संशयित सुटल्यावर त्यांनी दहशत पसरत, द्वेष भावना निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्या, तसेच दुचाकीवरून साताऱ्यातून कोरेगावकडे निघून गेले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे रिटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार माने तपास करत आहेत.