सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील दहिवडी येथील एका नामवंत विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आईसमोरच स्वतःचे जीवन संपवले. दहिवडी- फलटण रस्त्यावरील माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दहिवडी येथील एका नामांकित विद्यालयात ही अल्पवयीन विद्यार्थिनी इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी (ता. १०) नेहमीप्रमाणे ती शाळेत गेली; पण नंतर वर्गात दप्तर ठेवून ती बाहेर गेली. ही बाब शाळेतील शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विद्यार्थिनीच्या आईशी फोनवरून संपर्क साधून सांगितली. याबाबत आईने शाळेत येऊन खात्री केली असता मुलगी शाळेत आढळून आली नाही; परंतु दप्तर मात्र शाळेत मिळाले.
दप्तर घेण्यासाठी आपली मुलगी निश्चित येणार म्हणून आई शाळेतच थांबली होती. सुमारे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आईला आपली मुलगी शाळेकडे येताना दिसली. आई आपल्याला आता ओरडेल, मारेल, या भीतीने मुलीने शाळेच्या समोरून माणगंगा नदीच्या दिशेने पळण्यास सुरुवात केली. मुलगी पुढे व आई मागे पळत दहिवडी – फलटण रस्त्यावरील माणगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ पोचल्या. यावेळी आई तिला थांब थांब म्हणत असताना मुलीने नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली.
घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मुलीस पाण्यातून बाहेर काढले. तिला दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बापू खांडेकर अधिक तपास करत आहेत.