कराड प्रतिनिधी । कराडला येऊन दूध घालून ते दुचाकीवरून आपल्या तांबवे गावाकडं परतत होते. दूध घालून कराड – पाटण मार्गावरून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. तांबवे गावच्या एका दूध विक्रेत्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. हणमंत (बाळासाहेब) रघुनाथ पाटील (वय- 52, रा. तांबवे, ता. कराड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दूध विक्रेत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तांबवे गावचे शेतकरी दूध विक्रेते हणमंत (बाळासाहेब) पाटील हे कराड, मलकापूर शहरासह परिसरात घरोघरी जाऊन दूध घालत असत. नेहमी प्रमाणे ते दूध घालण्यासाठी शनिवारी गेले होते. रात्री दूध घातल्यानंतर ते कराड पाटण मार्गे आपल्या तांबवे या गावी दुचाकी क्रमांक (MH-11-V-5417) वरून परतत होते. कराडहून तांबवे गावी परतत असताना ते आरटीओ ऑफिससमोर आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
या धडकेमुळे हणमंत पाटील दुचाकीसह रस्त्याकडेला जाऊन पडले. काही कळणार इतक्यात संबंधित धडक दिलेल्या वाहनाचा वाहनचालक वाहनासह घटना स्थळावरून फरार झाला. या घडलेल्या घटनेची माहिती तांबवे गावातील ग्रामस्थांना मिळताच गावातील काही लोकांनी अपघातस्थळी तात्काळ धाव घेतली. तसेच दुसरीकडे कराड शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच अपघातातील दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.