कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा जिल्हा पोलीस दल आणि वडूज पोलीस ठाणे यांच्यावतीने गणेशोत्सव व ईद – ए – मिलाद या सणांच्या निमित्ताने जातीय सलोखा व शांतता समितीची बैठक उंब्रज येथे नुकतीच घेण्यात आली. यावेळी अनंत चतुर्दशी तथा गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक आणि पवित्र ईद असे दोन्ही सण गुरूवार, दि. 28 रोजी एकाच दिवशी येत असून गाव पातळीवर दोन्ही समाजानी योग्य समन्वय साधावा तसेच सण अतिशय आनंदाने व एकोप्याने साजरा करावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक बापूसाहेब बांगर यांनी केले.
यावेळी खटाव – माण तालुक्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, प्रा.अजय शेटे, विजय शिंदे, प्रा. एन. एस. गोडसे, शशिकांत देशमुख, महेश गुरव, ईकबाल शेख,विजय शेटे ,संकेत म्हामणे,सुहास राजमाने, शशिकला देशमुख ,इम्रान शेख, ईसाक मुल्ला, राजेंद्र गोडसे,पंकज सावंत, राजू भाई मुलाणी, सिराज शेख,पत्रकार नितीन राऊत,आय्याज मुल्ला, विनोद खाडे, मुन्ना मुल्ला, लालासाहेब माने, संतोष साळुंखे , वडूजसह कुरोली, भोसरे, गुरसाळे, कातर खटाव, नढवळ, हिंगणे, दाळ मोडी, गणेशवाडी तसेच पंचक्रोशीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी बांगर पुढे म्हणाले, पुसेसावळी येथील घटनेमुळे मानवी मूल्ये पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे. अशा घटनांमध्ये जर समाजाने पोलीस यंत्रणेला प्रतिक्रिया न देता प्रतिसाद दिला असता तर घटनेची तीव्रता वाढली नसती.पोलीस घटनेचा तपास योग्य दिशेने व निष्पक्षपातीपणे करत होतेच, फक्त अशा वेळी गावातील जाणत्या व्यक्तींनी जर दोन्ही समाजात योग्य बोलणी करून,समन्वय साधला असता तर निश्चितच हि वाईट घटना टाळता आली असती. शेतात एखाद्या शेतकऱ्याची गंज कळत – नकळत कारणांनी पेटली तरी आजूबाजूचे सर्वजन जात – पात – धर्म विचारात न घेता ती आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वोत परी प्रयत्न करतात व नुकसानीची तीव्रता टाळतात.
सामाजिक परिस्थिती निकोप ठेवण्यासाठी लोकांनी प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असले पाहिजे. तसेच तुम्हाला जर काही आक्षेपार्ह आढळले तर स्वतः कायदा हातात न घेता पोलीसांच्या निदर्शनास त्या गोष्टी आणून द्याव्यात. सर्वांचे रक्षण करण्यास तुमच्या पैकीच एक असलेले ,तसेच संख्येनेपण कमी असणारे ,परंतु प्रशिक्षित असे पोलीस दल त्यासाठी नक्कीच सज्ज आहे, असे बांगर यांनी म्हटले.