महाबळेश्‍वरमध्ये निघाला धनगर समाजाचा मोर्चा; केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, याचे पडसात महाबळेश्वरमध्येही उमटले. ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर येथील तहसील कार्यालयावर सकल धनगर समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पिवळ्या टोप्या व पिवळे झेंडे हातामध्ये घेऊन धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरले होते.

यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची सरकारने अंमलबजावणी करावी, याकरिता शासनाला जाग आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती दिली.

सकल धनगर समाजाच्या वतीने काढलेला हा मोर्चा मुख्य बाजारपेठमार्गे तहसील कार्यालयापर्यंत पोचला. तेथे या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी प्रवीण काकडे यांनी धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना उपस्थितांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी काढलेल्या मोर्चात माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे, प्रवीण काकडे, प्रशांत आखाडे, रोहित ढेबे, रमाकांत आखाडे, रमेश चोरमले, अभय डोईफोडे, अशोक ढेबे, शंकर ढेबे, सुनील ढेबे, सचिन ढेबे, संतोष आखाडे, अजय आखाडे, संदीप आखाडे, प्रशांत कात्रट, राजू हिरवे, अनिल ढेबे, तुकाराम शिंदे यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.