अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणाला 4 वर्षे सक्तमजुरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हर्षद पप्पू रणदिवे (वय २०, रा. चौधरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) याला विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश के. व्ही. बोरा यांनी चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे, हे हर्षद दणदिवे याला माहित होते. असे असतानाही त्याने तिला गोड बोलून एका ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुला मारीन, अशी धमकीही दिली.

फलटण शहर पोलिस ठाण्यात रणदिवे याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ११ सप्टेंबर २०१९ रोजी घडली होती. तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक व्ही. ए. देसाई यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या दरम्यान एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी हर्षद रणदिवे याला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

सहायक सरकारी वकील मंजूषा तळवळकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना प्राॅसिक्युशन स्काॅडचे पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी, सुनील सावंत, सहायक फाैजदार शशिकांत गोळे, अंमलदार गजानन फरांदे, मंजूर मणेर यांनी सहकार्य केले.