कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात रविवारी धक्कादायक घटना घडली. स्थानिक लोकांनी ग्रामपंचायतीसह पोलिस अधीक्षक आणि कराड तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज करत सुरू असलेला बेकायदा दारू विक्री अड्डा बंद करण्याची मागणी कराड तालुक्यातील आटकेतील ग्रामस्थांनी केली होती. या मागणीची दखल घेत तालुका पोलिसांनी चौकशीसाठी बोलविण्यात आल्याचा राग मनात धरून अवैध दारू विक्रेत्याने गावचे पोलिस पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी पोलिस पाटील यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जयवंत रघुनाथ काळे असे जखमी पोलिस पाटील यांचे नाव आहे, तर किशोर – चव्हाण असे संशयिताचे नाव असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील आटके गावचे पोलिस पाटील म्हणून काळे हे काही वर्षांपासून कार्यरत आहेत. तर मागील काही दिवसांपासून किशोर चव्हाण याने अवैधपणे दारू विक्री सुरू केली आहे. दारू विक्रीमुळे होणाऱ्या त्रासामुळे काही स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीसह पोलिस अधीक्षक व तालुका पोलिसांकडे तक्रार अर्ज करून हा अवैध दारू अड्डा उद्धवस्त करण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत शनिवारी तालुका पोलिसांनी किशोर चव्हाण याच्यावर कारवाई केली होती. कारवाईनंतर रात्री साडेनऊच्या सुमारास किशोर चव्हाण गावी पोहचला आणि त्याने पोलीस पाटील यांना जयवंत काळे यांना घरातून बाहेर बोलावून घेतले.
यावेळी त्याने जयवंत काळे यांच्या खिशातील मोबाईल काढून घेत आपल्या घराकडे ये, मोबाईल देतो असे सांगत तो तेथून निघून गेला. पोलीस पाटील जयवंत काळे हे मोबाईल परत घेण्यासाठी नाईकवा मंदिर परिसरात गेले असता किशोर चव्हाणने अचानक खुरपे घेऊन जयवंत काळे यांच्यावर हल्ला केला. याचवेळी नाईकबा मंदिर परिसरात काही स्थानिक लोक बोलत बसले होते. त्यांनी ही घटना पाहताच घटनास्थळी धाव घेत जयवंत काळे यांचा बचाव केला. त्यानंतर जखमी जयवंत काळे यांना कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
रूग्णालयात तातडीने काळे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयातून सांगण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिसांनी किशोर चव्हाण याला अटक केली आहे.