कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील तळबीड येथील शिवारात अत्यावस्थेत बिबट्याचा बछडा आढळून आला असून वनविभाग आणि रेस्क्यू टीमने या बछड्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत असलेल्या चव्हाण मळ्यात एका ऊसाच्या शेतामध्ये आज शनिवारी सकाळी बिबट्याचा बछडा शेतकऱ्यांना दिसून आला. शेतकऱ्यांनि जवळ जाऊन पाहिले असता त्यांना बछडा चालत नसल्याचे दिसले. शेतकऱ्यांनी तातडीने याबाबतची माहिती वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांना दिली.
शेतकऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रेस्क्यू टीमचे पथक त्याठिकाणी दाखल झाले. तसेच पथकाने बछड्याला ताब्यात घेतले. तसेच तातडीने त्याला पशुवैद्यकीय केंद्रात दाखल करण्यात आले.
त्याठिकाणी तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बछड्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. संबंधित बछडा आजारी असून अनेक दिवसांपासून तो उपाशी असावा, असा वनविभागाचा अंदाज आहे. हा बछडा मादी जातीचा असून सुमारे तीन महिने वयाचा आहे. उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
आज सकाळी बिबट्याचा बछडा आढळून आयांनी माहिती तळबीड येथील शेतकऱ्यांनी दिली शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन बछड्यास ताब्यात घेतले आहे. त्या बछड्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.