कराड तालुक्यातील वराडेत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर ऊसातून आलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना कराड तालुक्यातील वराडे येथे घडली. यावेळी शेतकऱ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. ही घटना शनिवारी दि. १९ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गावच्या पश्चिमेस वारसुळे नावच्या शिवारात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे येथील शेतकरी दीपक शिवाजी साळुंखे शनिवारी १९ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास वैरण आणण्यासाठी त्यांच्या वारसुळे शिवारातील शेतात गेले होते. ऊसातून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप टाकली.

अचानक घडलेल्या या प्रकाराने ते घाबरून गेले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करुन ऊस हलविल्याने बिबट्याने धुम ठोकली व साळुंखे यांचे प्राण वाचले. बिबट्याच्या हल्लात शेतकरी दीपक साळुंखे यांना किरकोळ जखम झाली आहे. या घटनेची माहिती कळवल्यानंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास वन विभागाच्या पथकाने या शिवारात पाहणी केली. त्यावेळी बिबट्याने कोणते तरी पाळीव प्राणी ओढत नेल्याचे दिसून आले. वराडे येथे रस्त्याच्या पश्चिमेस गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे.

गावात अनेकदा घुसलेले बिबटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. तसेच गावात भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत फिरणारे तीन बिबटे सीसीटीव्हीत अनेकदा दिसून आले आहेत. या बिबट्यांनी गावातील अनेक पाळीव कुत्री, शेळ्या फस्त केल्या आहेत. दिवसेंदिवस येथे बिबट्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शनिवारी बिबट्याने शेतकऱ्याच्या अंगावर झेप टाकल्याने या परिसरात जाणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांची गाळण उडाली आहे.