कराड प्रतिनिधी | गेल्या तीन महिन्यांपासून नडशी ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनाच्या वादावर अखेर प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर, रेल्वे प्रशासन व नडशी ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीने पडदा पडला. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश रेल्वे प्रशासन व ग्रामस्थांना समजावून सांगितला.
त्यामध्ये आधी पर्यायी मार्गाची व्यवस्था नंतरच बोगद्याचे काम सुरू करणे व त्यानुसारच कार्यवाही करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला केल्या तसेच ग्रामस्थांनी रेल्वेच्या कामात अडथळा आणू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
तत्पूर्वी रेल्वे गेट क्रमांक ९६ परिसरात पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी मगच भुयारी पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी नडशी ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. परंतू या मागणीकडे दुर्लक्ष करत रेल्वे प्रशासनाकडून भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले. याबाबत नडशी ग्रामस्थांना माहिती मिळताच आक्रमक ग्रामस्थांनी भुयारी मार्गाचे काम बंद पाडले. जोपर्यंत पर्यायी रस्त्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत काम करुन देणार नाही अशी भूमिका घेण्यात आल्यामुळे अखेर रेल्वे प्रशासनाला नमते घेत काम थांबवावे लागले.
यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी ग्रामस्थ आणि रेल्वे प्रशासन यांची चर्चा घडवून आणत मध्यम मार्ग काढत पर्यायी रस्त्याची डागडुजी करून रहदारीसाठी योग्य असा करावा नंतरच बोगद्याचे काम सुरू करा अशी सुचना केली. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या सूचना धुडकावत बोगद्याचे काम सुरूच ठेवल्याने ग्रामस्थ व रेल्वे प्रशासनामध्ये वादाच्या घटना घडल्या. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर झालेल्या प्रांत अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर, रेल्वे प्रशासन व नडशी ग्रामस्थांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत नडशी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. यापुढे बोगद्याच्या कामात अडथळा न आणण्याचा निर्णय घेतला व नवीन भुयारी मार्गासाठी संविधानिक मार्गाने पाठपुरावा करण्याचा ठराव केला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून स.पो.नि. किरण भोसले व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.