सातारा प्रतिनिधी | सातारा-सज्जनगड रस्त्यावर दुभाजक तोडून पन्नास फूट खोल दरीत जीप कोसळून दोनजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यातून काहीजण जीप शिकण्यासाठी सज्जनगड सातारा रस्त्याने जात होते. बोगदा ओलांडल्यानंतर छोट्या घाटामध्ये चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे जीप पन्नास फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. परंतु दोनजण किरकोळस जखमी झाले. त्यांना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची नावे पोलिसांनाही समजू शकली नाहीत. या अपघातानंतर शिवेंद्रसिहराजे भोसले रेसक्यू टीमचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
तसेच सातारा तालुका पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर अशाच पद्धतीने एक अपघात झाला होता. या नंतर दुसरा अपघात झाला आहे.