सातारा प्रतिनिधी । दिवाळी सणामुळे सर्वत्र फटाक्यांची दुकाने लागलेली आहेत. तर अनेकजण फटाके खरेदी करून ते घरामध्ये ठेवत आहेत. मात्र, फटाके ठेवताना त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर ती घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. अशीच घटना साताऱ्यातील मध्यभागी असणाऱ्या प्रतापगंज पेठेत गुरुवारी रात्री घडली. येथील SBI बँकेसमोरील घरात ठेवलेल्या फटाक्यांमुळे घराला आग लागली. या आगीत किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थाळी दाखल होत आग आटोक्यात आणली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा येथील प्रतापगंज पेठेतील एका घरात दिवाळीसाठी आणलेले फटाके पेटल्याने घराला आग लागल्याची घटना गुरूवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीमुळे आणि फटाक्याच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. परिणामी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तत्काळ वीजपुरवठा खंडीत करण्यात आला.
घरात लागलेल्या आगीबाबत परिसरातील नागरिकांनी सातारा पालिकेच्या अग्निशमन दलास माहिती दिली. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी गाडीसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी घरातील साहित्य, फटाके आणि गॅस सिलेंडर घराबाहेर सुरक्षितपणे हलवले.