आरेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी 3 बकऱ्या ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । जनावरांच्या गोठ्यातील पत्रा उचकटून एक शेळी व तीन बकरी बिबट्याने ठार केल्याची घटना कराड तालुक्यातील आरेवाडी येथील गुरवकी बेंद शिवारात घडली. या घटनेमुळे आरेवाडी परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील आरेवाडी येथील शेत शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावरत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले होते. दरम्यान, काल आरेवाडीतील शेतकरी आनंद गणपती साळुंखे यांच्या शेतातील बंद शेडमध्ये एक शेळी तीन बकरी होत्या. आनंद साळुंखे शेतातून चारा घेऊन जनावरांना घालून आल्यानंतर ते घरी आले. त्यावेळी दुपारच्यावेळी बिबट्याने जनावरांच्या गोठयात प्रवेश केला आणि हल्ला करून गोठ्यातील एक शेळी आणि तीन बकरी ठार केल्या. सायंकाळी पुन्हा शेतकरी साळुंखे परत आपल्या जनावरांच्या गोठ्यात आले असता त्यांनी गोठ्यात शेळी व बकरी मृत अस्वस्थेत पडलेल्या पाहिल्या.

अचानक बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले केले जात असल्यामुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसापासून तांबवे परिसरात गमेवाडी, आरेवाडी, पाठरवाडी,डेळेवाडी या भागांमध्ये बिबट्याचा अनेक दिवसापासून वावर आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतामध्ये काम करायला मजूर, शेतकरी जायला घाबरत आहेत. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा व बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावराच्या शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आरेवाडीतील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.