कराड प्रतिनिधी | रिक्षातून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीला कॉलेजवर उतरायचे होते. मात्र, चालकाने तेथे रिक्षा न थांबवता पुढे नेली. त्याचवेळी तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केल्याने घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी मारून सुटका करून घेतली. विद्यानगर-कराड परिसरात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी संबधीत रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया करीत असल्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगीतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून तीन मुली रिक्षातून विद्यानगर येथील कॉलेज परिसरात निघाल्या होत्या. त्यातील दोघी गाडगे महाराज महाविद्यालय परिसरात उतरल्या. तिसरी मुलगी आयटीआय कॉलेजकडे जानाऱ्या रस्त्यावर उतरणार होती.
मात्र, तेथे गेल्यानंतर चालकाने त्या थांब्यावर न थांबता रिक्षा तशीच पुढे नेली. माझा स्टॉप आला आहे, रिक्षा थांबवा, असे त्या मुलीने सांगूनही त्याने रिक्षा थांबवली नाही. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने ओरडत रिक्षातून उडी मारून आपली सुटका करून घेतली. रिक्षातून उडी मारल्याने मुलीला किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर परिसरातील नागरीक त्याठिकाणी जमले. घटनेची माहिती समजताच पोलिसही तेथे पोचले. त्यांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपअधीक्षक ठाकूर, पोलिस निरिक्षक के. एन. पाटील यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्याबाबत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.