सातारा प्रतिनिधी । भरधाव वेगात मद्यधुंद कारचालकाने 12 वर्षीय मुलीला उडवले. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला तर कारचालकाने पुढे जाऊन दुचाकीवरील दोघांना उडवले. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सातारा रोड पळशी दरम्यान कोलवडी गावात खंडाळा शिरूर राज्यमार्गावर सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
जान्हवी सतीश जगदाळे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील कोलवडी गावामध्ये रस्त्याच्या बाजूने निघालेल्या 13 वर्षीय युवतीला विरुद्ध दिशेने भरधाव वेगात मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका कारचालकाने जोरदार धडक दिली. यामध्ये बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक पवार असे कार मालकाचे नाव आहे. अपघातानंतर कारचालकाने कार न थांबवता पुढे जाऊन दुचाकीवरील आणखी दोन जणांना उडवल्याने यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून कारचालक फरार झाला. त्यानंतर भिमनगर येथील एका शेतात संबंधित अपघातग्रस्त कार आढळून आली आहे.
या प्रकरणात कोलवडी गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संशयित कारचालकाला पोलीस ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात मुलीच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.