सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीत गॅस वाहतूक करणारा एक कंटेनर पलटी झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, कंटेनर (क्रमांक MH43Y7694) हा पुण्याहून सातारच्या दिशेने निघाला होता. कंटेनर सारोळे गावच्या हद्दीत आला असता येथील एका वळणावर कंटेनरचा टायर अचानक फुटला. त्यानंतर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. आणि कंटेनर महामार्गावरच पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. सुमारे एका तासानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. या अपघातामुळे वाहनचालकांना मोठी गैरसोयीला सामोरे जावे लागले. तसेच, गॅस गळतीची शक्यता असल्यामुळे काही वेळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता. कोणतीही काळजी न घेता व सुरक्षेचा विचार न करता सुमारे ५५० किलो गॅस असलेला कंटेनर क्रेंनच्या साह्याने बाजूला करण्यात आला.