सातारा प्रतिनिधी । राज्यात लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळ्याचे प्रमाण वाढले आहे. यातील काही टोळ्यांच्या मुसक्या पोलीस प्रशासनाकडून आवळण्यात आल्या आहेत. दरम्यान, लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या एका टोळीवर पोलिसांनी कारवाई केली असून टोळीतील तीन पुरुष व नवरीसह चार महिलांना ताब्यात घेतले आहे. कुडाळ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूरसह सातारा जिल्ह्यातील दोघं आरोपींचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये नवरी मुलीसह संशयित विशाल मच्छिंद्र थोरात ( ३४, रा. उंदीरगाव रस्ता, गोडेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर,), माधुरी प्रभाकर केदारी उर्फ भारती मदन ठोंबरे (३२, रा. संजयनगर, सूतगिरणी गेट, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), संतोष दौलू काकडे ( ३७, रा. शिरोली, ता. करवीर जि. कोल्हापूर), संतोष गणाजी जगदाळे (४०, रा. दहीवडी, ता. माण, जि. सातारा), ज्योती संतोष शेलार ( ४३, रा. ता. वाई, जि. सातारा), मंगल संजय महापुरे (४८, रा. हेर्ले, हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. या सर्वांना अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर, सातारा येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अटक करण्यात आलेल्या संशयित टोळीने कुडाळ तालुक्यातील एकाचे लग्न लावले. लग्न झाल्यानांतर नवरी त्या ठिकाणाहून पळून गेली. हे लग्न लावण्यासाठी संबंधित टोळीतील व्यक्तींनी सुमारे १ लाख ४० हजार रुपये वर पक्षातील पार्टीकडून घेतले होते. मुलगी पळून गेल्याने आपली फसवणूक झाल्याने जेव्हा नवरदेवाकडच्यांना समजले तेव्हा त्यांच्याकडील लोकांपैकी ४२ वर्षीय तक्रारदार यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात धाव घेत फरवणुकीचा गुन्हा दाखल केला.
त्यांनी तक्रारीत म्हंटले कि, गेल्या चार वर्षांपासून लग्नाकरिता स्थळ पाहत होते. एक महिन्यापूर्वी अझिज नाईक (रा. माणगाव, ता. कुडाळ) व महेश पाटकर (रा. पाट दळवीवाडी, ता. कुडाळ) यांनी कुडाळ कोर्टाजवळील पाटेश्वर मंदिरात तक्रारदारास बोलावून अझिज नाईक याने चार पुरुष व महिलांना आणून मुलगी दाखवली. तिचे नाव रुपाली दत्ताजी पाटीलअसल्याचे सांगितले. तसेच, इतर आरोपींची ओळख त्या मुलीचे नातेवाईक म्हणून करून दिली.
लग्नकार्यासाठी १ लाख ४० हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून घेतले. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी हुमरमळा वालावल येथे रुपाली पाटील हिच्याशी धार्मिक पद्धतीने लग्न लावून दिले. २६ फेब्रुवारी रोजी ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी तक्रारदार लग्न केलेल्या युवतीसह घरी आले. दुपारनंतर रुपाली पाटील ही घरातून कोणालाही न सांगता निघून गेली, असल्याचे तक्रारीत तक्रारदाराने म्हंटले आहे.