सातारा प्रतिनिधी | मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने गुन्हे करणार्या टोळी प्रमुखास तिघा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. प्रेम उर्फ बबलू विलास पार्टे (वय 24), गणेश विष्णू शिंदे (वय 23), सनी विकास कासुर्डे (वय 22) आणि राहुल रामा कुर्हाडे (वय 25, सर्व रा. मेढा, ता. जावळी) अशी टोळीतील आरोपींची नावे आहेत. या चौघांना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या टोळीवर गर्दी, मारामारी, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, दारुची चोरटी विक्री, असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी या टोळीला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची चौकशी वाईचे पोलीस उपअधीक्षक बी. वाय. भालचिम यांनी केली होती. या टोळीच्या सदस्यांना वेळोवेळी अटक आणि प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत बदल होत नव्हता. त्यांना कायद्याचा धाक न राहिल्याने नागरिकांना उपद्रव होत होता.
त्यामुळे या टोळीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. या प्रस्तावावर समीर शेख यांच्यासमोर सुनावणी होऊन, हद्दपारीचा आदेश पारीत करण्यात आला. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, महेश शिंदे यांनी पुरावे सादर केले. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली.