सातारा प्रतिनिधी । दोघांचा संसार म्हंटलं कि संसारात कधी प्रेम, वाद हे होतातच. वाद झाला तर पती आपल्या जवळच्या मित्रासोबत बोलत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. तर पत्नी त्याच्या जवळच्या नातेवाईक किव्हा घरातील व्यक्तीसोबत बोलते. मात्र, पती व पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने विविध ठिकाणी नेऊन विवाहित तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणावर सातारा शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
अजित सदाशिव बागल (वय २६, रा. लिंब गोवे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित विवाहित तरुणी २३ वर्षांची असून पती-पत्नीमध्ये अधूनमधून किर्कोळ कारणांवरून वाद होत होते. यावेळी पीडितेची इन्स्टाग्रामवर अजित बागलशी ओळख झाली. त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्याचा फायदा घेत सातारा शहरातील विविध ठिकाणी लाॅजवर नेऊन तरुणीवर अत्याचार केला.
सन २०२० ते दि. २८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. शेवटी पीडितेने तरुणाला लग्नाबाबत विचारना केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पीडित विवाहित तरुणीने सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सहायक पोलिस निरीक्षक मते हे अधिक तपास करीत आहेत.