सातारा प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीने तिकीट न काढता फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवासी आणि बुक न केलेले साहित्य याच्या दंडातून एक लाख ७१ हजार ४२० प्रकरणांतून दहा कोटी ७३ लाख रुपये कमावले. केवळ सप्टेंबर महिन्यात ९२ लाख ८२ हजार २५ रुपये वसूल केलेले आहेत.
सप्टेंबर २०२४ मध्ये पुणे विभागातील तिकीट तपासणी दरम्यान २० हजार ५६९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले व त्यांच्याकडून ८० लाख ८१ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अनियमितपणे व विनातिकीट प्रवास करणाऱ्या दोन हजार ९७६ प्रवाशांकडून ११ लाख ५० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बुक न केलेले साहित्य घेऊन जाणाऱ्या ३८७ प्रवाशांकडून ४९ हजार ५७५ रुपये दंड असा एकूण ९२ लाख ८२ हजार २५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, तसेच विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंतकुमार बेहरा यांच्या समन्वयाने व तिकीट तपासणी निरीक्षक व रेल्वे संरक्षण दलाच्या सहकार्याने करण्यात आली आहे.