कराडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवल्यानंतर तणाव निवळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा

भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी सकाळी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांचे समर्थक दत्त चौकात आले. त्याचवेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार बाळासाहेब पाटील हे शक्तीप्रदर्शन करत दत्त चौकात दाखल झाले होते. दोन्ही बाजुचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर झेंडे फडकावत दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली. त्यातून कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावन गेल्याने त्यांच्यात राडा झाला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला

दत्त चौकात बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवलं. पोलिसांनी बळाचा वापर करताच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते शांत झाले. त्यामुळे काही काळानंतर तणाव निवळला. आमदार समर्थकांना पोलिसांनी दत्त चौकातून पुढे जायला सांगितल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचीही पांगापांग झाली.

भाजप उमेदवाराला दुपारी मिळाला एबी फॉर्म

भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांनी सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर मनोज घोरपडे पुन्हा त्याठिकाणी आले. ते पक्षाने दिलेला एबी फॉर्म जोडण्यासाठी आले होते. परंतु, त्यापुर्वी झालेल्या राड्यामुळं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी तातडीने धाव घेऊन दोन्ही उमेदवारांना समोरासमोर येऊ दिलं नाही.