कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील उंब्रज
येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या एका गटारात स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत सापडल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. या अमानवी कृत्याबद्दल उंब्रजमधील नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी दि. ३० रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उंब्रज येथील रस्त्यावर मुले क्रिकेट खेळत होती. खेळताना मुलांचा बाॅल गटारात गेला. तेव्हा त्या मुलांना हे स्त्री जातीचे अभ्रक मृत अवस्थेत दिसून आले. यानंतर परिसरात मुलांनी ही घटना नागरिकांना सांगितली. यानंतर काही ग्रामस्थांनी उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर व कर्मचारी यांनी एक तासाने या घटनेची दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन अर्भक ताब्यात घेतले. त्यानंतर ते अर्भक शवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे.
अहवालानंतर सदर अर्भकाविषयी अधिकची माहिती स्पष्ट होणार आहे. गटारात मिळालेले अर्भक स्त्री जातीचे असून पूर्ण वाढ झालेले आहे. गेल्या दोन 3 दिवसांपासून ते गटारात असल्याचा कयास असून त्याची दुर्गंधी ही परिसरात पसरली होती.