पोलिसांना सापडेना चोरीला गेलेली म्हैस; कालेच्या शेतकऱ्यानं ठेवलंय 5 हजाराचं बक्षीस

0
984
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य ध्यानीमनी ठेवत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या संरक्षणासाठी ऊन, वारा, पाऊस असे कोणतेही संकट आले तरी न डगमगता खंबीरपणे पोलीस उभे राहतात. एखाद्या नागरिकांच्या घरात चोरी झाल्यास त्या चोरट्याचा शोध देखील पोलीस चोवीस तासाच्या आत चोरीचा छडा लावतात. मात्र, कराड तालुक्यातील काले गावात एका शेतकऱ्याची २९ हजाराची चोरीस गेलेली म्हैस १५ दिवस झाले तरी पोलिसांना शोधून काढता आलेली नाही. पोलिसांच्या कासवगतीने केल्या जाणाऱ्या तपासाला कंटाळून आता शेतकऱ्यानं म्हैस शोधून देणाऱ्यास ५ हजाराचे बक्षीस देऊ असे सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील काले गावात 71 वर्षीय शेतकरी लक्ष्मण शंकर करपे हे आपल्या पत्नी शालन, मोठा मुलगा आनंदा, लहान मुलगा वामन, मोठी सून उमा, लहान सून शितल, नातू यश, शिवराज, शिवाशु नात वैष्णवी याच्यासोबत राहतात. लक्ष्मण करपे शेतीसोबत पशुपालन देखील करत असून त्यांनी घरापासून काही अंतरावर जनावराचा गोठा बांधून त्यामध्ये एक म्हैस व एक गायीचा सांभाळ करत आहेत.

दि. 20/06/2025 रोजी रात्री 11.00 वाजण्याच्या सुमारास लक्षण करपे यांच्या मोठ्या मुलाने गोठ्यामध्ये जाऊन नेहमीप्रमाणे जनावरांना वैरण घातली आणि गोठ्याच्या जवळ असणाऱ्या जुन्या घरात जावून झोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. 21 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे जनावरांचे गोठ्यामध्ये शेण काढण्यासाठी गेले असता गोठ्यात दुगल जातीची म्हैस दिसली नाही. तर दावणीतील दोरी देखील कापलेली दिसली. त्यांनी तत्काळ जनावरांच्या गोठ्याच्या आजूबाजूला म्हैस कुठे गेली तर नाही ना? याची चौकशी केली.

मात्र, म्हैशीचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यांनी गोठ्याबाहेर जाऊन पाहिले असता त्यांना गोठ्याजवळ चारचाकी मोठ्या वाहनाच्या टायरचे व्रण दिसून आले. त्यानंतर त्यांची खात्री पटली की कोणी अज्ञाताने दोर कापून म्हैस चोरून नेली आहे. चोरून नेलेली म्हैस शोधण्यासाठी सांगोला, वडगाव येथील बाजारात व आजूबाजूच्या गावात त्यांनी शोध घेतला मात्र, ती कुठेच आढळून आली नसल्यामुळे कराड तालुका पोलीस ठाणेत म्हैस चोरीबाबत तक्रार दिली.

त्यानंतर पोलिसांनी दोन दिवसानंतर घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पंचनामा देखील केला. तेथील आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी देखील केली. मात्र, त्यांना अद्यापही चोरीस गेलेली म्हैस शोधून काढता आलेली नाही. आज बारा ते पंधरा दिवस झाले तालुका पोलिसांना लक्ष्मण करपे यांची सुमारे २९ हजार रुपये किमतीची असलेली काळ्या रंगाची दुगल जातीची गाभण म्हैस, तिचे दोन गोल शिंग त्यास पुसटसा निळा रंग, काळ्या रंगाच्या दोरीची म्होरकी, मागचे उजवे पायास नखीजवळ दोरीने बांधलेला कंडा असलेली म्हैस पोलिसांना अद्यापही शोधून काढता आलेली नाही. आता लवकरात लवकर पोलिसांनी आपली चोरीस गेलेली म्हैस आपल्याला मिळवून द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्याकडून केली जात आहे.

म्हैस शोधून द्या अन 5 हजाराचं बक्षीस घेऊन जा…

काले गावातील 71 वर्षीय शेतकरी लक्ष्मण शंकर करपे यांनी पोलिसांच्या तपासाला कंटाळून आपली चोरीस गेलेली म्हैस शोधून देणाऱ्यास ५ हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल अशी ऑफर ठेवली आहे. जो कोणी म्हैस शोधून देईल त्याला ५ हजार रुपये बक्षीस देऊ असे संबंधित शेतकऱ्यानं सांगितलं आहे.

म्हैशीचा तपास अजून सुरु आहे…

गेली दहा ते पंधरा दिवस झाले म्हैस चोरीस गेली असून याबाबत वयोवृद्ध शेतकरी लक्ष्मण करपे यांचे नातू यश करपे यांनी पोलिसांकडे विचारणा केल्यास अजून तपास सुरु आहे. चोरीस गेलेल्या म्हैशीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिस सांगत आहेत. त्यांच्या कासवगतीने केल्या जात असलेल्या तपासामुळे आपली म्हैस लवकर मिळावी म्हणून आम्ही म्हैस शोधून देणाऱ्यास ५ हजार रुपयाचे बक्षीस देऊ अशी ऑफर ठेवली असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण करपे यांचे नातू यश करपे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.