सातारा प्रतिनिधी । कोंबडीच्या पोल्ट्री शेड धुताना विजेचा धक्का लागल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मोरघर येथे काल घडली. विजय सुमंत गायकवाड उर्फ पप्पू गायकवाड (वय ३८) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूनंतर मोरघरसह आनेवाडी, सायगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काल सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विजय हे त्यांच्या जावळी तालुक्यातील भणंग येथील पोल्ट्री शेडमध्ये आपल्या रोजच्या कामासाठी गेले होते. एचटीपी मोटरच्या साह्याने शेड धुऊन साफसफाई करण्याचे काम सुरू होते. मात्र, त्यावेळी अचानक या मोटरचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यावेळी शेडमध्ये ते एकटेच असल्याने कोणालाही या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत काहीच समजले नाही. काल दिवसभर कुटुंबीयांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र, कॉल उचलला न गेल्याने शेवटी त्यांच्या कुटुंबातील व मित्रमंडळींनी रात्री साडेआठ वाजता भणंग येथील शेडवर जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी गायकवाड मृत अवस्थेत पडलेले आढळून आले.
विजय हे मोरघर गावातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते होते. कमी वयात पोल्ट्री व्यवसाय टाकून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली होती. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुले, वडील असा परिवार आहे. आकस्मिक घटनेमुळे मोरघर गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद मेढा पोलीस स्टेशनला झाली झाली असून घटनेचा तपास सुरू आहे.