कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील ओंड येथील डॉ. हेमंत प्रभाकर रेळेकर (वय ५०) यांनी आपल्या दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
कराड तालुक्यातील बाजारपेठेचे गाव म्हणून ओंड गावची ओळख आहे. या ठिकाणी डॉ. हेमंत रेळेकर व त्यांच्या पत्नी डॉ.दिपा रेळेकर हे अनेक वर्षांपासून आपला वैद्यकीय व्यवसाय करत होते.ओंडोशी रस्त्यावर त्यांचे रेळेकर हॉस्पिटल होते.तर पहिल्या मजल्यावर ते आई, पत्नी, मुलगा,मुलगी असे परिवारासह रहात होते.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, आज बुधवारी सकाळी डॉ. हेमंत रेळेकर हे नेहमी प्रमाणे आपल्या दवाखान्यात आले. यावेळी ते बराचवेळ घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी दवाखान्यात जाऊन पाहिले. यावेळी त्यांनी दवाखान्यामध्येच एका खोलीमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती कराड तालुका पोलिसांत दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास कराड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आत्महत्या करण्यामागचे नेमके कशा कारण स्पष्ट झाले नाही.