कराड प्रतिनिधी | कराड व पाटण तालुक्यातील कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढत होत आहे. दरम्यान, आज अचानक नदीकाठच्या गावात राहणाऱ्या काही ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाले आहे. निसरे ग्रामपंचायतीचा कर्मचारी शरद कोळी हा पाण्याच्या टाकीत टीसीएल टाकण्यासाठी गेला असताना त्याला नदीपात्राच्या कडेला मगर दिसल्याने त्याने याबाबत गावातील ग्रामस्थांना कलपणा दिली. नदीकाठच्या गावांमध्ये मगरीचे दर्शन होऊ लागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सध्या कोयना नदीपात्रामध्ये मगरीचे वास्तव्य पहावयास मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोयना नदी काठावर मगरी आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास निसरे ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा ऑपरेटर शरद कोळी हे कोयना नदीकाठावर कोळीवाडा नावाच्या शिवारात असणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या टाकीवर टीसीएल टाकण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांना टाकीच्या शेजारी मगर दिसली. ही माहिती त्यांनी निसरे गावात दिली. तर गेली तीन ते चार महिन्यापूर्वी मंद्रुळ हवेली येथील कोयना नदी पानवट्यावर भली मोठी मगर दिसली होती.
ग्रामपंचायतीने नदीकाठी सतर्क राहण्याच्या अनुषंगाने बॅनर लावला होता. त्यानंतर निसरे येथील पाणवठयावर मगरीचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात निसरे गाव हे कोयना नदी शेजारी आहे. निसरे बंधारा व निसरे मोठा पूल जवळच असल्याने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी या भागामध्ये न जाण्याचे आवाहन निसरे ग्रामपंचायतीने केले आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना नदीची पाणी पातळी वाढत आहे. अशा परिस्थितीत नदीपात्रात मगरीचे दर्शन झाल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.