कराड प्रतिनिधी | सैदापूर विद्यानगर परिसरातील कॅफेमध्ये नियमांचे पालन होते का?, हे पाहण्यासाठी कराड शहर पोलिसांनी अचानक कॅफेची पाहणी केली. यावेळी अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करताना युवक सापडला. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी सुर्या कॅफेच्या चालकासह संबंधित युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
जय संतोष पाटील (वय २१, रा. वडगाव हवेली, ता. कराड) आणि कॅफेचालक अभिषेक सिध्दप्पा अंकलगी (वय ३३, रा. मलकापूर, ता. कराड), अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाविद्यालय परिसरातील सैदापूर, विद्यानगर, बनवडी या ठिकाणी अनेक कॅफे आहेत. ते नियमानुसार चालतात का? हे तपासण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कॅफेंची अचानक तपासणी केली. यावेळी सुर्या कॅफेच्या दुसऱ्या मजल्यावर संशयित जय संतोष पाटील हा अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल कृत्य करताना सापडला. अशा कृत्यासाठी कॅफे चालक अभिषेक सिध्दप्पा अंकलगी हा मदत करत असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांना दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे हे गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.