सातारा प्रतिनिधी | सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात झाडे पडणे, दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. गुरूवारी पहाटेच्या सुमारास सातारा – ठोसेघर मार्गावरील सज्जनगड परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.
जिल्ह्यात मागील २५ दिवसांपासून पाऊस पडत आहे. सुरुवातीला पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाचे प्रमाण चांगले राहिले. विशेषत: करुन पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यात चांगला पाऊस झाला. यामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. तसेच बंधाऱ्यात आणि पाझर तलावातही चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाली. तर पश्चिम भागात मागील चार दिवसांत संततधार होती.
कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वर भागात दमदार पाऊस झाला. लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला होता. त्यातच या पावसाने रस्त्यावर छोट्या दरडी कोसळणे, वृक्ष पडणे अशा घटना घडल्या. पण, बुधवारपासून पश्चिमेकडे पावसाचा जोर कमी झाला आहे.