सातारा प्रतिनिधी । पावसामुळे घाट मार्गात दरड कोसळण्याच्या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा – कास मार्गावर आज पहाटेच्या सुमारास यवतेश्वर घाटात दरड कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, कोसळलेल्या दरडीतील छोटी- मोठी दगडे रस्त्यालगत पडली होती.
सातारा ते कास या मार्गावर यवतेश्वर घाट लागतो. या घाट मार्गात डोंगर असल्याने डोंगरांची दरड पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना घडतात. आत्तापर्यंत घाटात चार ठिकाणी तीन ते चार वेळा दरड कोसळली आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी मोठ्या प्रमाणात मुरूम, माती, दगडे खाली ढासळत आली आहेत. मोठ्या प्रमाणावर दगड झुडूपांसह रस्त्यावर पडल्यामुले काहीकाळ वाहतूक थांबली आली होती.
जागतिक वारसास्थळ कास पठार परिसरात पावसाळ्यामुळे शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांकडून गर्दी केली जाते. दरम्यान, शनिवारी सकाळी घाटाच्या प्रारंभीच रस्त्यावर अल्प प्रमाणात ढासळलेली माती, दगडे संबंधित विभागाने हटवावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.