महाबळेश्वर – सातारा मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळली; एकेरी वाहतूक सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर- केळघर परिसरात मान्सूनने जोर धरला असून सरीवर सरी बरसत आहेत. जावळी तालुक्यातील मेढा हद्दीत येत असलेल्या महाबळेश्वर – सातारा मार्गावर केळघर घाटात दरड कोसळण्याची घटना आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे घाटातील वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत दरड काढण्याचे काम सुरु करण्यात आले असून एकेरी वाहतूक चालू करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पावसामुळे या तालुक्यातील घाटमार्गात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून वाहनधारकांना काळजी घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. या दरम्यान आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास जावळी तालुक्यातील केळघर घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणत्याही वाहनांचे नुकसान देखील झाले नाही.

या घटनेची माहिती वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर कर्मचारी जेसीबी मशीनसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. असून घाट मार्गातील वाहतूक एकेरी मार्गाने सुरु करण्यात आली आहे. सातारा येथून महाबळेश्वरला जाण्यासाठी या मार्गाचा प्रवाशी व पर्यटक मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात.