सातारा प्रतिनिधी । गुटखा व्यावसायिकाने धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने आज दुपारी सदर बझारमधील लक्ष्मी प्रकाश डागा, प्रकाश डागा यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे.
सातारा शहरातील सदर बझारमध्ये लक्ष्मी डागा या आपले पती प्रकाश डागा व कुटुंबियासोबत राहतात. रविवार पेठेतील जुनी भाजी मंडईत राहणारा साहिल कोलकर, सलीम कोलकर, क्षमाप्पा कोलकर हे प्रकाश डागा व इतर कुटुंबियांकडे दोन लाखांची खंडणी मागत होते.
सातारा येथील पालकमंत्री शंभूराजेंच्या घरासमोर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, साताऱ्यात खळबळ pic.twitter.com/ob3R8h99bv
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 20, 2023
खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर गुटखा विक्री करा, तुम्हाला जास्तीचे पैसे देतो, असे म्हणत त्या तिघांकडून प्रकाश डागा यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. त्यालाही नकार दिल्याने कोलकरांकडून खंडणीच्या कारणावरून प्रकाश डागा व इतरांना मारहाणही झाली होती. कराड, सांगली येथील गुंड आणून संपुर्ण कुटुंबाला जिवंत मारण्याची धमकीही मारहाणीवेळी देण्यात आल्याचे लक्ष्मी डागा यांचे म्हणणे आहे.
याबाबतचा तक्रार अर्ज लक्ष्मी डागा यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केला होता. अर्ज करुनही पोलिसांनी दखल न घेतल्याने लक्ष्मी डागा, प्रकाश डागा यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर शुक्रवारी आत्मदहनाचा इशारा दिला होता. यानुसार त्याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दुपारी बाराच्या सुमारास लक्ष्मी डागा, प्रकाश डागा यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगावर पाण्याचा मारा केला. त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.