सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम करताना कामगार छतावरून कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. जितेंद्र मारुती भिलारे (वय ४५, रा. भिलार, ता. महाबळेश्वर) असे मृताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. जितेंद्र भिलारे हे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास काम करत असताना अचानक छतावरून कोसळले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती सागर सुभाष शिंदे यांनी पोलिसांना दिली.
मृत कामगाराच्या नातेवाइकांना या अपघाताची माहिती देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, याबाबतचा अधिकचा तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष शेलार करत आहेत.