सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदारास १५ हजार रुपयांची लाच घेताना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून हि कारवाई केली.
पोलीस उपनिरीक्षक बिपीन बाळकृष्ण चव्हाण व पोलीस हवालदार उमेश दत्तात्रय गहिण अशी लाच प्रकारणी कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत. याबाबात अधिक माहिती अशी की, तक्रारदार याने वाई पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सामूहीक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करणेकरीता लाच मागितली असल्याची तक्रार एसीबीकडे केली होती. मागणी होत असलेल्या लाच मागणीबाबत दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ४ जुलै २०२५ रोजी वाई पोलीस ठाण्याच्या आवारात केलेल्या पडताळणीमध्ये पोलीस हवालदार गहिण याने उपनिरीक्षक चव्हाण याच्याकरीता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदारावर गुन्हा दाखल न करणेकरीता पंचासमक्ष रूपये २० हजाराची लाच मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रूपये लाच रक्कम स्विकारताना प्रशासकीय इमारतीमधील पोलीस ठाण्यात बीट अंमलदार कक्षात सापळा लावला. उपनिरीक्षक चव्हाण व हवालदार गहिण याच्या समवेत तक्रारदार याच्याशी पंचासमक्ष झालेल्या पडताळणीमध्ये तक्रारदारास शिवीगाळ दमदाटी करून हाताने चापटी मारून अटक करण्याची भिती दाखवून लाच मागणीस प्रोत्साहन दिले.
तक्रारदाराने लाच मागणीस होकार दर्शवताच त्यास सांगेल, तेव्हा साक्षीदार व्हायचं असे बोलून हवालदार गहिण याचे लाच मागणीस प्रोत्साहन दिले. सदर लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सातारा लाच लुचपत विभागाचे उपनिरीक्षक राजेश वाघमारे, पोलीस हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे करीत आहेत.