कराड प्रतिनिधी । नदी तसेच तलाव, विहिरींमध्ये गणपती विसर्जनासाठी जाताना काळजी घेण्याचा सल्ला घरच्यांकडून मुलांना दिला जातो. मात्र, त्याचे काहीवेळेला पालन न केल्यास अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी घटना कराड तालुक्यातील खराडे गावात गृवर सायंकाळी घडली. येथील महाविद्यालयीन युवक गणेश संतोष जाधव (वय 19, रा. खराडे, ता. कराड) हा युवक बुडाला. यानंतर ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. या बुडालेल्या युवकाचा रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पाण्यात शोध घेण्यात आला मात्र, तो आढळून आला नाही. सैन्य दलात भरती होण्यासाठी हा युवक तयारी करत असताना काळाने अशा प्रकारे घाला घातल्याने याबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गावातील गणेश इतरांसोबत आपल्या घरातील घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कृष्णा नदीत गेला होता. गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तो नदीतील पाण्यात उतरला. मात्र, त्याला नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने अशात पोहताही येत नसल्यामुळे तो तसाच पाण्यात बुडाला. यावेळी गणेशसोबत असलेल्या इतरांनी गणेश दिसत नसल्यामुळे त्याचा पाण्यात शोध घेतला. मात्र, तो कुठेच आढळून आला नाही. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना तसेच कराड पालिकेच्या आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांना दिली.
दरम्यान, कराड पालिकेचे आपत्कालीन विभागातील कर्मचारी बोटीसह कृष्णा नदीतील घडलेल्या घटनास्थळी दाखल झाले. तसेच नदीत उतरून बोटीच्या साह्याने गणेशचा शोध घेतला. मात्र, व कुठेच आढळून आला नाही. आज सकाळपासून गणेशाचे पुन्हा शोधकार्याची मोहीम सुरु करण्यात आली. मात्र, तो आढळून आला नाही. मसूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल असूनत्यांच्याकडून युवकाचा शोध घेतला जात आहे. कराड येथील एक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या व सैन्य दलात भरतीसाठी सराव करत असलेल्या गणेशच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्च्यात आई – वडिल व एक लहान बहिण असा परिवार आहे.