सातारा प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की, अनेक शहरातील धोकादायक इमारतीं कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडतात. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पालिका प्रशासनाकडून पावसाळा सुरु झाली अशा धोकादायक इमारतीमधील राहणाऱ्यांना नोटीस देखील दिली जाते. सध्या सातारा शहरात शंभरी पार केलेल्या अशा धोकादायक इमारतींची संख्या ३०० हून अधिक आहे. आजही हजारो नागरिक अशा धोकादायक इमारतींमध्येच जीव मुठीत धरून राहत आहेत.
सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील पालिकांच्यावतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक इमारतींत राहणाऱ्या मिळकदारांना नोटीस बजावून इमारत पाडण्याच्या सूचना केल्या जातात. काही इमारतींवर धोक्याचा फलकही लावला जातो. मात्र, न्यायप्रविष्ट बाब असल्याने एकही मिळकदार ही बाब गांभीर्याने घेत नाही. गेल्या १८ वर्षांत सातारा शहरातील केवळ ५० मिळकतदारांनी आपल्या धोकादायक इमारती स्वतःहून पाडल्या आहेत.
यंदाच्या वर्षी सातारा शहरात पालिका प्रशासनाकडून धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्व्हे करताना पालिका प्रशासनाकडून नोटीस देखील बजावल्या जात आहेत. पालिकेकडे नोंदणी झालेल्यापैकी ३०० इमारती धोकादायक आहे आहेत.
सातारा पालिकेकडून नोटीसद्वारे कारवाई
सातारा शहरात ज्या इमारती धोकादायक आहेत, अशा मिळकतदारांना पालिकेकडून वेळोवेळी नोटीस बजावून धोक्याची कल्पना दिली जात आहे. गेल्यावर्षी इमारत पाडण्यासाठी लागणारी यंत्रणा पालिकेकडून उपलब्ध करण्यात आली होती. यासाठी येणारा खर्च मात्र मिळकतदाराला द्यावा लागणार होता. मात्र, या आवाहनालाही नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. धोकादायक इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने पालिकेला नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही कारवाई करता येत नाही.