भाविकांची कार ओढ्यात कोसळली, अपघातात आजोबांसह चिमुकला ठार तर चौघेजण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मेढा-सातारा रस्त्यावरील हमदाबाज नजीकच्या वळणावर भाविकांची भरधाव कार ओढ्याच्या पुलावरील कठड्याला धडकून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आजोबांसह तीन महिन्यांचा नातू ठार झाला असून एकाच कुटुंबातील चौघे जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण कराड तालुक्यातील पाल येथे खंडोबाच्या दर्शनाला निघाले होते. या अपघातातील मृत आणि जखमी हे सावली (ता. जावळी) गावचे आहेत.

पुलावरील कठड्याला कार धडकून झालेल्या अपघातात नामदेव पांडुरंग जुनघरे (वय ५८) आणि त्यांचा नातू आद्विक अमर चिकणे (वय ३ महिने, रा. सावली, ता. जावली), अशी मृतांची नावे आहेत, तर, मुलाची आजी सुवर्णा नामदेव जुनघरे, आई पुजा अमर चिकणे व मामा प्रसाद नामदेव जुनघरे (सर्व रा. सावली) व अन्य एक, असे चौघेजण जखमी झाले आहेत. चारचाकी गाडीने गुरूवारी दुपारी ते पाल (ता. कराड) येथे देवदर्शनाला निघाले होते.

या भाविकांची भरधाव कार हमदाबाज हद्दीतील वळणावर असलेल्या ओढ्याच्या कठड्याला धडकली. या अपघातात आजोबा व नातवाचामृत्यू झाला, तर बाकीचे जखमी झाले. जखमींना नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशीरा मृतदेहांचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. नातेवाईकांचा आक्रोश’हृदय पिळवटून टाकत होता.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाच्या पंचनाम्याला सुरूवात केली. तसेच सातारा-जावली मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद सातारा ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेणकर व हवालदार विशााल मोरे या अपघाताचा तपास करत आहेत.