धोम-बलकवडीच्या कालव्यात बाप-लेक गेले वाहून; चिमुकल्याचा मृत्यू, वडील बेपत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना रविवारी घडली आहे. पाय घसरून धोम-बलकवडी धरणाच्या कालव्यात पडलेल्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी बापाने कालव्यात उडी मारली. मात्र, दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला असून वडील बेपत्ता आहे. शंभूराज विक्रम पवार (वय ५ वर्षे), असे मृत चिमुकल्याचे नाव असून त्याचे वडील विक्रम मधुकर पवार (वय ३२) यांचा शोध सुरू आहे.

धुणे धुवायला गेल्यानंतर घडली दुर्घटना

अजनुज (ता. खंडाळा) येथील मधुकर पवार, त्यांचा मुलगा विक्रम, सून आणि नातू शंभूराज हे धोम बलकवडी कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते. शंभुराज हा पाय घसरून कालव्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी वडील विक्रम यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे बाप-लेक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आजोबा मधुकर पवार हे त्यांना वाचवायला गेले असता तेही पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले.

सुनेने सासऱ्यांना वाचवले

या थरारक प्रसंगी मधुकर पवार यांच्या सुनेने सासऱ्यांच्या दिशेने साडी टाकली. साडीच्या साह्याने त्यांना पाण्यातून बाहेर काढून वाचवले. मात्र, पती विक्रम आणि मुलगा शंभुराज हे वाहून गेले. घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर पाण्यातून वाहताना दिसलेल्या शंभूराजला शिरवळ रेस्क्यू टीमने पाण्यात उड्या मारून बाहेर काढले. उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

रेस्क्यू टीमने राबवली शोध मोहीम

शिरवळ रेस्क्यू टीम आणि शिरवळ पोलिसांनी विक्रम मधुकर पवार यांचा रात्री उशीरापर्यंत शोध घेतला. मात्र, ते सापडले नव्हते. अंधारामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली. दरम्यान , या घटनेची माहिती मिळताच खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, पोलीस निरिक्षक सुनिल शेळके, नायब तहसिलदार योगेश चंदनशिवे, मंडलाधिकारी संतोष नाबर यांनी भेट दिली. या घटनेची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.