सातारा प्रतिनिधी । नवरा बायकोचे भांडण झाल्यास त्याचा लहान मुलांवर देखील परिणाम होतो. कारण त्यावेळी त्या ठिकाणी ते भांडण लहान मुलेही पाहत व ऐकत असतात. त्याबाबत शिक्षा देखील होऊ शकते. असाच काहीसा प्रकार सातारा शहरात घडला असून सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलीसमोर बायकोला अश्लील शिवीगाळ करणे हे नवऱ्याला भोवलं आहे. ही घटना सातारा शहरात रविवारी दि. ४ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला ही ३३ वर्षांची असून, राहत्या घरात तिच्या पतीने १३ वर्षांच्या लहान मुलीसमोर ‘तुझी आई अडाणी आहे,’ असे म्हणत अत्यंत खालच्या भाषेत अश्लील शिवीगाळ केली. तसेच रागाच्या भरात पत्नीच्या डोक्याचे केस उपटून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
हा सर्व प्रकार त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीसमोर घडला. त्यामुळे मुलीसमोर गैर वर्तन केल्याने वडिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव हे अधिक तपास करीत आहेत.