सातारा शहरातील पहिलाच गुन्हा : पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागार्फत दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालिकेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

प्रवीण एकनाथ यादव (रा. धादमे कॉलनी, करंजे पेठ, सातारा) अपसंपदेचा सातारा शहरातील बहुदा हा पहिलाच गुन्हा आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोग्य निरीक्षक यादव यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीची दखल घेऊन १ जानेवारी २०१० ते ८ जानेवारी २०२० यादरम्यान वेळोवेळी झालेल्या तपासणीमध्ये प्रवीण यादव यांनी एकूण उत्पन्न स्रोताच्या २८.१ टक्के अधिक संपत्ती गैर मार्गाने मिळवल्याचे स्पष्ट झाले. ही अपसंपदा ११ लाख ७० रुपये इतकी आहे.

लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक विक्रम पवार यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ वर्षांपूर्वी सातारा पालिकेत अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उपमुख्याधिकाऱ्यासह आरोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यामध्ये प्रवीण यादव यांचा समावेश होता. या प्रकरणात त्यांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू होती. त्या चाैकशीत त्यांच्याकडे ११ लाखांची अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाले. हे जुने प्रकरण आता पुन्हा यानिमित्ताने चर्चेत आले आहे.