सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वडूज पोलिस ठाण्यात निर्भया पथकात कार्यरत असलेल्या महिला पोलिस व तिच्या भावाविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस राणी खाडे- ओंबासे आणि तिचा भाऊ प्रमोद खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे असून याप्रकरणी सासूने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिलेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास महिला पोलिस आणि तिच्या भावाने सासू व पती अतुल ओंबासे यांना घरात घुसून मारहाण केली. मारहाण होताना फिर्यादीने प्रमोद खाडे याला अडवले असता त्याने धमकी देत शिवीगाळ करत गळ्यातील बोरमाळ व मणी तोडून घेतले, तसेच फिर्यादीच्या कानाखाली मारून साडी ओढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
प्रमोद खाडे व राणी खाडे ओंबासे यांच्यासोबत आलेल्या 4 ते 5 जणांनी अतुल ओंबासे यांना दगड आणि लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केले. फिर्यादीचा नातू प्रभास यास बळजबरी घेऊन गेले. फिर्यादीची सून राणी खाडे- ओंबासे हिनेही स्वतःच्या पतीस अतुल ओंबासे यास मी तुझा खून करण्यासाठी आली आहे, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांच्याकडून केला जात आहे.