कराड प्रतिनिधी । केंद्रीय राखीव दलात अधिकारी असल्याचे सांगत सोशल मीडियावर फोटो पाठवून जुने फर्निचर विक्री करण्याच्या नावाखाली 90 हजार रुपयांचा गंडा घालण्यात असल्याची घटना कराड तालुक्यात घडली आहे. याबाबत रेठरे खुर्द, ता. कराड येथील प्रशांत प्रकाश पाटील यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोषकुमार नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील रेठरे खुर्द मध्ये राहत असलेले प्रशांत पाटील हे त्याच्या घरामध्ये बसले होते. यावेळी त्यांचा मित्र गणेश सपकाळ त्यांच्याकडे आला. घरामध्ये गप्पा मारत असताना गणेशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोलीस उपअधीक्षक विक्रम साळी यांचा मेसेज आला असून सीआरपीएफ अधिकारी संतोषकुमार यांचे फर्निचर विक्री करायचे असल्याचे सांगण्यात आले होते. बदली झाल्यामुळे संतोषकुमार हा ते फर्निचर कमी किमतीत विकणार होता.
प्रशांत पाटील यांनी गणेश सपकाळ याच्या मोबाईलमध्ये फर्निचरचे फोटो पाहिले. त्यांना ते फर्निचर आवडले. त्यामुळे संतोषकुमार याच्याशी संपर्क साधून त्यांनी त्या वस्तू खरेदी करणार असल्याची माहिती दिली. सदर फर्निचरची किंमत 90 हजार रुपये असल्याचे संतोषकुमार याने सांगितले. त्यानुसार प्रशांत पाटील यांनी 90 हजार रुपये आॅनलाईन पाठवले.
मात्र, त्यानंतरही संतोषकुमार याने गणेश सपकाळ याच्या मोबाईलवर फोन करून आणखी 15 हजार 500 रुपयांची मागणी केली. संशय आल्यामुळे गणेश यांनी पोलीस उपअधीक्षक विक्रम साळी यांना फोन करून संबंधित मेसेजबाबत विचारणा केली. मात्र, त्यावेळी उपअधिक्षक साळी यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचे सांगून आणखी पैसे देवू नका, अशी सुचना केली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशांत पाटील यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करीत आहेत.