कराड प्रतिनिधी | अनेकवेळा काही किरकोळ कारणावरून वाद होत असतात. मात्र, वादात रागाच्या भरात कोणी काय करेल याचा नेम नाही. अशीच रागाच्या भरात चक्क पोलिसाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना सातारा शहरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सातारा शहर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याला पाठलाग करत मारहाण केल्याप्रकरणी चौघा जनाविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेत योगेश जाधव हे कार्यरत आहेत. ते शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वायसी कॉलेज परिसरातून पोवई नाक्याकडे दुचाकीवरून येत होते.
यावेळी त्यांचा पाठलाग करत दोन दुचाकीवरून चार युवक त्याठिकाणी आले. त्यांनी योगेश जाधव यांना अडवले. यानंतर त्या चौघांनी ‘तू गल्लीत खूप दादागिरी करतो. तुझ्याशेजारी राहणाऱ्या दगडू पिसाळ, नितीन पिसाळ यांना दमदाटी करतो,’ असे म्हणत त्या चौघांनी योगेश जाधव यांना लाकडी दांडके, लोखंडी पट्टीने मारण्यास सुरुवात केली.
मारहाणीत योगेश जाधव यांच्या डोक्यास दुखापत झाली. मारहाणीनंतर ते चौघेही त्याठिकाणाहून निघून गेले. याची तक्रार रात्री जाधव यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली असून, अज्ञात चौघांवर मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास हवालदार भवारी हे करीत आहेत.