सातारा प्रतिनिधी | शेतजमिनीत रस्ता खुला करण्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी जावळी तालुका धनकवडी येथील पाच जणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील धनकवडी येथील जमीन गट नं. ५०/८ या क्षेत्रामध्ये जाणे – येणेकरिता रस्ता खुला करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. त्यानुसार मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर हे मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उपस्थित होते. दरम्यान, रोहित रामदास इंगुळकर, साहिल रामदास इंगुळकर, संस्कार मारुती इंगुळकर, रामदास बाबूराव इंगुळकर व लता रामदास इंगुळकर (सर्व रा. धनकवडी) यांनी रस्ता खुला करण्यास विरोध केला.
तसेच रस्ता खुला करून देणार नाही, असे सांगून गोंधळ घालून शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. याबाबतची फिर्याद हवालदार प्रदीप उदागे यांनी मेढा पोलिस ठाण्यात दाखल केली असून, त्यानुसार पाच जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर करत आहेत.