सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात शस्त्र घेऊन खुल्लेआम दहशत माजवण्याचा प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अशा घटना घडल्यानंतर तात्काळ संबंधितांवर पोलिसांकडून देखील कारवाई केली जात आहे. अशीच घटना नुकतीच सातारा शहरातील गोडोलीच्या गोळीबार मैदान परिसरात घडली. या ठिकाणी एकजण बेकायदेशीररित्या तलवार घेऊन फिरताना आढळून आला त्यावेळी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
विजय सखाराम यादव (रा. गोडोली, सातारा. मूळ रा. कोंडवे, ता. सातारा) असे कारवाई करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विजय यादव हा दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास शहरातील गोडोलीच्या गोळीबार मैदान परिसरात बेकायदेशिररित्या लोखंडी मूठ असलेली तलावर घेऊन फिरत असल्याचे दिसून आले.
याप्रकरणी हवालदार सचिन रिटे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विजय यादव याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस फाैजदार दिघे हे तपास करीत आहेत.