उडतारे फाट्यावर ST चालकास मारहाण, CRPF च्या जवानासह दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील उडतारे येथील फाट्यावर एसटीने दुचाकीला ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून सीआरपीएफमधील जवान व त्याच्या साथीदाराने एसटी चालकाला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. याप्रकरणी सीआरपीएफमधील जवानासह दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीआरपीएफ जवान अजय गणपत शिर्के (वय ३१, मूळ रा. आढूळ, ता. पाटण सध्या काश्मीर), रोहित रघुनाथ साळुंखे (वय २४, रा. चिखली, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, एसटी चालक विलास भगवान उमापे (वय ४७, रा. उंब्रज ता. कराड) हे दि. १० रोजी दुपारी अडीच वाजता महामार्गावरून एसटी घेऊन साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी उडतारे फाट्यावर संशयित दुचाकीला ओव्हरटेक केल्याचा राग धरून संशयित दोघांनी एसटीच्या पुढे आणून दुचाकी थांबविली.

एसटी केबिनचा दरवाजा उघडून चालक विलास उमापे यांना खाली ओढून कॉलरला पकडून हाताने लाथाबुक्क्याने त्यांनी मारहाण केली. ‘आम्ही पोलिस आहे, तुम्हाला आमच्यावर काय केस करायची ती करा,’ असे म्हणून तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी दिली. यानंतर एसटी सातारा बसस्थानकात आल्यानंतर एटीएस रूममध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणला. तसेच तेथे देखील हाताने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकारानंतर एसटी चालक विलास उमापे यांनी रात्री ९ वाजता सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गवळी हे करीत आहेत.