सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील साठेवाडी येथील घरकुलाच्या जागेची मोजणी करून द्यावी अशी मागणी करीत उत्तम मोरे याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक लता घरात यांच्या अंगावर डिझेल ओतून ढकलून दिल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी उत्तम मोरे याच्यासह तीन जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा व जिवे मारण्याच्या प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताबाई दादा मोरे, उत्तम व्यंकट मोरे आणि सुमित पद्माकर मोरे, (तिघे रा. साठेवाडी, ता. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबात अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील साठेवाडी गावात मुक्ताबाई दादा मोरे या राहतात. त्यांना शासनाकडून रमाई आवास योजनेतून घरकूल मंजूर झाले असून या घरकुलासाठी दिलेल्या शासकीय जागेची मोजणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास पत्रव्यवहार केला होता. मात्र, या कार्यालयाकडून संबंधित जागेचा सातबारा उतारा व लेआउट पाहिल्यानंतर कमी- जास्त पत्रक झाले नसल्याने मोजणी करता येणार नसल्याबाबतचे पत्र गटविकास अधिकारी कार्यालयात दिले होते. त्याचबरोबर कमी- जास्त पत्रक झाल्याशिवाय मोजणी करता येणार नसल्याचेही कळविले होते. भूमी अभिलेख उपअधीक्षक लता घरात या मंगळवारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आपल्या दालनातून बाहेर पडण्यासाठी निघाल्या.
त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या उत्तम मोरे याने दालनामधील खुर्चीवर जाऊन घरात यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी घरात यांनी “मी न्यायालयात साक्ष देण्यासाठी चालले आहे, तेथून आल्यानंतर तुमच्याशी बोलते,” असे सांगून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, उत्तम मोरे याने मुक्ताबाई मोरे यांच्या कामाचा काय तो आत्ताच्या आता निकाल लावा, असे म्हणत शिवीगाळ करत डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले व घरात यांच्या अंगावर टाकून ढकलून दिले. त्यानंतर खिशातील काडीपेटी काढून मी स्वतःला पेटवून घेतो, असे म्हणू लागला. त्यामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली.
यावेळी त्याठिकाणी असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेत मोरेस बाजूला आलेले व पुढील अनर्थ टळाला. याबाबत भूमी अभिलेख उपअधीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोरेगाव पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुक्ताबाई दादा मोरे, उत्तम व्यंकट मोरे आणि सुमित पद्माकर मोरे, (तिघे रा. साठेवाडी, ता. कोरेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत.