सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर कोळी आळी येथे दुर्गादेवीच्या मिरवणुकीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश प्रताप पिसाळ (वय 28, रा. आखाडे, ता. जावली), असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुर्गादेवीच्या मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पाईपचा भीषण स्फोट झाल्याची घटना महाबळेश्वर येथे मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेत आठ मुले आणि मुली भाजून गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेत आता ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर क्रमांक MH-11-DA-6490 आणि नंबर नसलेली ट्रॉली दुर्गादेवी विसर्जनाकरिता जात असताना ट्रॅक्टर चालक उमेश प्रताप पिसाळ वय 28 वर्षे रा.आखाडे ता. जावली याने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये 9 लहान मुले बसवून दुर्गादेवी विसर्जना मिरवणुकी दरम्यान हयगतीने निष्काळजीपणे चालवला. परिणामी ट्रॅक्टर मधील जनरेटरचा भडका झाल्याने कॅनमधील पेट्रोलने पेट घेतल्याने ट्रॉलीमधील 9 लहान मुलांच्या किरकोळ व गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झाला आहे, अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.