कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील विंग येथे नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेप्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासूवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृत विवाहितेची आई मिना अरुण कांबळे (रा. रविवार पेठ, बीड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून पती अनिकेत अंकूश माने व सासू राणी अंकूश माने (रा. विंग, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड येथील राहणाऱ्या नीलम यांचा विवाह कराड तालुक्यातील विंग येथील अनिकेत माने यांच्याशी दि. 9 मार्च 2023 रोजी झाला होता. विवाहानंतर सासू व पतीने नीलमला चांगली वागणूक दिली. मात्र, काही दिवसानंतर त्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून ते निलमला त्रास देत होते. याबाबत निलमने आईला फोन करून घडत असलेले सर्व प्रकार सांगितले होते.
चप्पलचे दुकान घेण्यासाठी माहेरहुन 4 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून सासू राणी माने व पती अनिकेत माने हे दोघेजण नीलमला वारंवार शिवीगाळ करून मारहाण करत होते. या त्रासाला कंटाळून नीलम हिने विंग येथील राहत्या घरातील स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद मृत विवाहितेची आई मीना कांबळे यांनी दिली आहे. यावरून नीलमला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनिकेत माने व सासू राणी माने या दोघांवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत.