सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या पुणे- बंगळूर, सातारा- लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संबंधित ठेकेदार कंपन्यांकडून केली जात आहेत. डागडुजीसह रुंदीकरणाची कामे हि दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहेत. मात्र, सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कोरेगाव शहरातून सुरू असताना त्यामध्ये वाहतूक सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात या रस्त्याचे काम करत असलेल्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फास्ट्रक्चर कंपनीच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित कंपनीच्या ठेकेदाराविरुद्ध जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण संभाजीराव बर्गे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किरण बर्गे हे मंगळवारी, दि. ८ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे मित्र रतन तलकचंद ओसवाल यांच्यासमवेत दुचाकीवरून एकंबे रस्त्यावरील एका भोजनालयाकडे जेवण करण्यासाठी निघालेले होते. त्यावेळी बंडोपंत कालेकर यांच्या घरासमोर महामार्गाच्या कामासाठी जेसीबी आदी मोठ्या यंत्रांच्या साहाय्याने मोठे खोदकामी केले असलेल्या ठिकाणी संबंधित कंपनीच्या ठेकेदारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे त्यांनी पाहिले.
त्या ठिकाणाहून जात असताना बर्गे आणि त्यांचे मित्र ओसवाल यांची दुचाकी क्रमांक (MH 11 3624) खड्ड्यात पडून अपघात झाला. त्यात चालक बर्गे यांच्या मांडी, हात, डोके व कपाळावर दुखापत झाली, तर ओसवाल यांच्या नाकाला गंभीर दुखापत होऊन त्यांना २० टाके पडले. तातडीने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बर्गे यांनी येथील पोलिसात मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फास्ट्रक्चरच्या ठेकेदाराविरुद्ध महामार्गाचे काम प्रत्यक्ष करताना वाहतूक सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना न केल्याने आपला अपघात झाल्याची तक्रार केली आहे. अधिक तपास कोरेगाव पोलिस करत आहेत.
महामार्गाच्या रुंदीकरणाचे 4 टप्प्यात काम
सातारा-कोरेगाव-म्हसवड-माळशिरस-अकलूज-टेंभुर्णी-कुर्डुवाडी-मुरूड-लातूर या ३०८.११७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रूपांतर महामार्गात करण्यात आले असून, या कामाची एकूण चार टप्प्यांतील २ हजार ६४ कोटी ८० लाख रुपये अंदाजित खर्चाची निविदा राज्य रस्ते विकास महामंडळाने नोव्हेंबर २०१६ काढली आहे. प्रशासकीयदृष्ट्या हा रस्ता चार विभागांतून जात असल्याने निविदेत त्याचे चार टप्पे पाडले आहेत. पहिला टप्पा ८५.६८६ किलोमीटरचा असून हे काम ५३५.१९ कोटी, दुसरा टप्पा ५७.६७८ किलोमीटरचा असून हे काम ३९७.३५ कोटी, तिसरा टप्पा ८२.७० किलोमीटरचा असून हे काम ५५२.९८ कोटी, तर चौथा टप्पा ८२.६८३ किलोमीटरचा असून हे काम ५७९.२८ कोटी रुपयांचे आहे. अशा एकूण ३०४.७४७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाची २ हजार ६४ कोटी ८० लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. प्रत्येक टप्प्याचे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा २४ महिने देण्यात आली असून, देखभाल अवधी प्रत्येकी चार वर्षांचा आहे.